
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ४० हजार रुपयांचा बियाणे साठा हस्तगत करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर बियाणे विक्री करणाऱ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दि. २० एप्रिल रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नितीन नंदलाल चौधरी (रा. चुंचाळे, ता. चोपडा, जि. जळगाव) हा व्यक्ती छुप्या पद्धतीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचा संशय होता. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तत्काळ तपासणी केली. तपासणीदरम्यान तब्बल ४५० पॅकेट बियाणे आढळून आले. यामध्ये ‘रिसर्च हायब्रीड कॉटन सीड सुपर किंग’ व ‘चॅलेंजर’ या नावाने विक्रीस ठेवलेली ९ पोती प्रतिबंधित बियाण्यांची जप्त करण्यात आली. या साठ्याची एकूण किंमत सुमारे ५.४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपी नितीन चौधरी याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा तालुका गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आर. एम. पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी योगिनी सोनवणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या पथकाने केली. यावेळी पोलीस विभागाकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल पारधी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे उपस्थित होते. आर. एम. पाटील यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे.





















