
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६
शहरातील इस्लामपुरा भागातील कसाई गल्लीत बेकायदेशीरपणे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी शनिवारी (दि. २६) सकाळी धाड टाकून सुमारे ३० किलो मांस जप्त केले. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना इस्लामपुरा भागातील मदिना मशीद परिसरात एका लाकडी पार्टिशनच्या दुकानात बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी त्यांनी तत्काळ पोलीस पथक आणि पंचांना पाचारण केले.
सकाळी सुमारे साडेदहा वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान सुमारे ३० किलो संशयित गोमांस व मांस कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश अशोक चोपडे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
डॉ. चोपडे यांनी मांसाची पाहणी करून सुमारे २०० ग्रॅम नमुना मिठासह हवाबंद डब्यात सील केला असून पुढील तपासणीसाठी तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश वासुदेव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजम शेख सलीम शेख (वय २४, रा. इस्लामपुरा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील, सुभाष चव्हाण, संभाज पाटील, गणेश ढाकणे, गजानन वाघ आणि निलेश घुगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.





















