
पाचोरा : प्रतिनिधी
लग्न हे एक आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहण्याचे घेतलेले वचन असते, परंतु आता सध्या लग्न हे जणू खेळ होत चाललेला आहे. अशातच एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी असतांनाही दुसऱ्या मुलीशी दुसरं लग्न करून पहिल्या पत्नीकडून घराच्या दुरुस्तीसाठी माहेरहून एक लाख आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी फिर्यादी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोऱ्यातील पुनगाव रोड वरील आदर्श नगरातील मोनाली अंकुश कटारे यांचा विवाह येथील अंकुश भगवान कटारे यांचेशी झाला आहे. दरम्यान त्यांना एक ८ वर्षाचा मुलगा देखील आहे. दरम्यान अंकुश कटारे यांनी पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले. घर दुरुस्तीसाठी हिचा माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून मोनालीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केल्याने मोनाली अंकुश कटारे हिच्या फिर्यादीवरून पती अंकुश भगवान कटारे, मेघना प्रविण मानकरी, रामकृष्ण दामू सोनवणे व अनुराधा रामकृष्ण सोनवणे सर्व रा. पाचोरा यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.




















