
शिंदखेडा : प्रतिनिधी
ओडिशा राज्यातील एका युवकाने धावत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु रेल्वे ट्र्क जवळ काही युवकानी त्याला वाचविले. यावेळी भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी यांच्या मदतीने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. धावत्या रेल्वेतून उडी घेऊन देखील या युवकाला सुदैवाने कुठलीही दुखापत झालेली नसल्याने प्रवाश्यांनी येथील युवकांचे कौतुक केले.
सविस्तर वृत्त असे की, ओडिशा राज्यातील युवक नारायण गुंड याने रेल्वेतून जात असताना भडणे गावानजीक चालत्या रेल्वेतून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जखमी झाल्याने व्यायाम करत असलेल्या युवकांना दिसून आला. त्या युवकांनी पोलीस पाटील युवराज माळी यांच्याशी संपर्क साधत झालेल्या घटनेची माहिती दिल्याने युवराज माळी यांनी सदर तरुणाच्या नातेवाईकांशी तसेच शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यानंतर युवकाला पोलीस ठाण्यात घेवून गेल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.




















