जळगाव मिरर | १८ जुलै २०२६
गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील खेडी येथे भरधाव वाळूचा डंपरने एका तरुणाला चिरडले होते. त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्या घटनेला २४ तास होत नाही तोच पुन्हा भरधाव वाळूच्या डंपरचा भीषण अपघात होऊन या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाळधी – तरसोद या नवीन महामार्गावर दिनांक १७ जुलै रोजी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास भरधाव वाळूच्या डंपरने पुढे जात असलेल्या एका कंटेनरला जबर धडक दिली या भीषण अपघातात वाळूचा डंपर चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मध्यरात्री तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घटनास्थळी महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाचे कुठलेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीसाठी महसूलसह पोलीस विभागाचा छुपा पाठिंबा आहे का ? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महामार्गावर चालणे झाले अवघड…
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच विविध अपघातातून सामान्य नागरिकांचा जीव जात आहे गेल्या 24 तास आधी खेडी गावाजवळ एका तरुणाला भरधाव अवैध वाळू वाहतुकीच्या डंपरने चिरडल्यामुळे एका तरुणाचा दुसऱ्या दिवशी प्राण गेला आहे. तरी देखील महसूल सह पोलीस विभाग शांत का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
‘त्या’ डंपरचा झाला चक्काचूर
दि.१७ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा चक्काचूर झाला आहे तर या डंपरचा चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र दुसऱ्या दिवशी देखील तालुका पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.





















