जळगाव मिरर | २१ जुलै २०२६
शाळा व महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुला-मुली दुर्गम ठिकाणी फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलिस दलाच्या दामिनी पथकाने सोमवारी विशेष मोहीम राबवून चार अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेतले. संबंधितांच्या पालकांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. समुपदेशन करून पालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर अल्पवयीनांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

दामिनी पथकाने सोमवारी मेहरूण तलाव, कोल्हे हिल्स परिसर तसेच सरस्वती विद्यालय परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान एकूण सहा जोडपी (कपल्स) आढळून आली. त्यापैकी चार जण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर महिला पोलिसांनी अल्पवयीन मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले. आपल्या पाल्यांनी शाळा किंवा महाविद्यालयात जात असल्याचे सांगून बाहेर फिरत असल्याची माहिती पालकांना देण्यात आली. मुला-मुलींचे तसेच पालकांचे समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन अल्पवयीनांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, दामिनी पथकातील महिला पोलिसांनी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांनाही भेटी देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. आई-वडिलांना चुकीची माहिती देऊन बाहेर फिरण्याचे धोके, वैयक्तिक सुरक्षितता, शिक्षणाचे महत्त्व तसेच सायबर फसवणूक आणि सामाजिक परिणाम याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





















