जळगाव मिरर । २४ जुलै २०२६
‘तुम्ही माझी दोन वर्षांची वेतनवाढ थांबविण्याबाबत पोलीस अधीक्षकांना लेखी रिपोर्ट का पाठवला ? तुम्ही भ्रष्टाचारी आहात,’ असे म्हणत पोलीस मुख्यालयातील हजेरी मेजर यांना शिवीगाळ करीत शासकीय कामात व्यत्यय आणला. तसेच वरिष्ठांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दि. २१ जुलै रोजी काढले.

पोलीस मुख्यालयात नियुक्तीस असलेल्या दोन महिला अंमलदार दि. १६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खाजगी वेशात हजेरी कक्षात गेल्या. तेथे त्यांनी कर्तव्यावर असलेले हजेरी मास्तर संभाजी पाटील यांना, ‘तुम्ही माझी दोन वर्षांची वेतनवाढ थांबविण्याबाबत पोलीस अधीक्षकांना लेखी रिपोर्ट का पाठवला ? तुम्ही भ्रष्टाचारी आहात,’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच खोटे आरोप करून नोकरी खाण्याची धमकी दिली. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशीही यांनी आक्रमक व बेजबाबदारपणे वर्तन केले.
या प्रकराची दखल घेत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना निलंबित केले आहे. निलंबन काळात या दोघींना दररोज सकाळी आणि संध्याकाळी राखीव पोलीस निरीक्षकांकडे हजेरी द्यावी लागणार असून, अधीक्षकांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुसऱ्या महिला अंमलदार यांनी हजेरी कक्षात जाऊन आपला गोपनीय अहवाल अधीक्षकांकडे का पाठवला, याचा जाब विचारला. हजेरी प्रमुखांनी त्यांना ‘तुमचा अहवाल आरपीआय साहेबांनी पाठवला आहे, तुम्ही त्यांना भेटा ‘असे सांगितले. याचा राग आल्याने त्या महिला अंमलदाराने यांनी हजेरी कक्षातील कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ सुरू केली. हजेरी प्रमुख, आरपीआय व अन्य एका कर्मचाऱ्याला चपलेने मारण्याची धमकी देत, ‘तुमच्या तिघांविरुद्ध कोर्टात केस दाखल करेल, तुम्हाला नोकरी करू देणार नाही,’अशी धमकीही त्यांनी दिली.





















