जळगाव मिरर | २५ जुलै २०२६
जळगाव जिल्ह्यातील यावळ तालुक्यातील सावखेडा सिम येथील पंढरपूर वारीसाठी गेलेल्या भाविक महिलेचा मोहोळ (जि. सोलापूर) येथे एसटी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २३ जुलै रोजी रात्री घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनाबाई रामलाल पाटील (वय ६५, रा. सावखेडा सिम) या धार्मिक प्रवृत्तीच्या असून पंढरपूर वारीसाठी बसने गेल्या होत्या. त्यांनी गाणगापूर व तुळजापूर येथील दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरमार्गे प्रवास सुरू ठेवला होता. दरम्यान, २३ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे बस थांबल्यानंतर त्या शौचासाठी जात असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एमएच १४ एनई ७१६० क्रमांकाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांना भाजप कार्यकर्ते दिनेश पाटील व कमलाकर पाटील यांनी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर आमदार जावळे यांनी तातडीने संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून शवविच्छेदनासह आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीबाबत सूचना दिल्या. तसेच मृताच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
अंजनाबाई पाटील यांच्या पार्थिवावर २४ जुलै रोजी दुपारी सावखेडा सिम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती रामलाल नागो पाटील, दोन मुले, सुना, नातवंडे, मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली असून, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.




















