जळगाव मिरर | २६ जुलै २०२६
जळगाव शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी दावा दाखल केल्याप्रकरणी अॅड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) व अॅड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) या दोन वकिलांना अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावासाठी संपादीत केल्यानंतर या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी वकिलांमार्फत एकूण ६३ कोटी रुपयांचा न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड, शिक्का व इतर कागदपत्रे वापरली होती.
या प्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात १७ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये अॅड. किशोर पाटील यांच्याविरुद्ध एकूण १७ व अॅड. प्रशांत बाविस्कर यांच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. दोघांना वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात २४ जुलै रोजी अटक करण्यात आले. या प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. २४ रोजी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.





















