जळगाव मिरर | 15 ऑगस्ट 2026
भुसावळ शहरातील एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुसावळ शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. तर आज दि. १५ ऑगस्ट रोजी पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या घटनेचे व्हीडीओ दाखविल्यानंतर तत्काळ या प्रकरणात दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना बाल न्यायव्यवस्थेअंतर्गत ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दि. २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.५८ वाजता गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक ४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मूळ घटना दि. २३ एप्रिल २०२६ रोजी घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित एक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत तपासाला वेग दिला. फिर्यादीच्या आईने दिलेल्या पुरवणी जबाबाच्या तसेच व्हायरल व्हिडिओतील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मूळ गुन्ह्यात वाढीव कलमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये BNS कलम १४०(१), BNS कलम १२७(२), IT Act कलम ६६(ई) आणि IT Act कलम ६७ या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सिद्धेश महाडिक (वय १९) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर रिमांड प्रक्रिया सुरू आहे. तसेच सागर साळुंखे (वय २२) यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर रिमांड प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांवरही कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एका अल्पवयीन मुलाचे वय १७ वर्षे ११ महिने असून, त्याला बाल न्यायव्यवस्थेअंतर्गत बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांची ओळख कायदेशीर कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेला पुन्हा वाचा फुटली असून, पोलिसांनी व्हिडिओतील तांत्रिक पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली आहे. सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीचे आक्षेपार्ह स्वरूपातील फोटो अथवा व्हिडिओ प्रसारित करण्याच्या प्रकारांचीही पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाणे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. प्रकरणातील अन्य बाबींचा तपास सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि तपासातून पुढील कारवाई केली जाणार आहे.




















