जळगाव मिरर | १ ऑक्टोंबर २०२६
हिमाचल प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेले चार संशयित आरोपी जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. हे आरोपी अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असताना पैसे संपल्याने व भूक लागल्यामुळे मोबाईल विकण्यासाठी जळगाव येथे उतरले होते. त्यांचे लोकेशन शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती हिमाचल पोलिसांनी जळगाव पोलिसांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार यांच्या खुनाप्रकरणी एफआयआर क्रमांक ८२/२०२६, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती व आरोपी एकत्रितपणे दारू पीत असताना मृताने आरोपींच्या बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यावरून संतापलेल्या आरोपींनी मुकेश कुमार यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून आरोपी तेथून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खुनानंतर आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता किसनपूर येथून निघून अंबाला येथे पोहोचले. तेथून अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०५८) ने सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपले तसेच भूक लागल्याने त्यांनी जळगाव येथे उतरून मोबाईल विकण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेश पोलिसांनी आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक रवाना केले.
पोलिस पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून चारही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यामध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार) आणि अजित कुमार (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील परि. पोउनि संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. चारही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांच्याशी समन्वय साधला जात आहे.





















