जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२६
देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याची आठवण पुढील पिढ्यांच्या मनात कायम जिवंत राहावी, या राष्ट्रभक्तीच्या भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘आमचे शहर, आमचा अभिमान’ या अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे.

जळगावातील जनरल अरुण वैद्य चौक (आकाशवाणी चौक) येथे शहीद जनरल अरुण वैद्य यांच्या शौर्याची आणि राष्ट्रसेवेची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी या चौकात सेवामुक्त रणगाडा स्थापित करण्याचा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
याच संकल्पाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जनरल अरुण वैद्य चौकात प्रस्तावित रणगाडा स्थापनेचे संकल्पचित्र साकारण्यात आले. रणगाडा आणि राष्ट्रध्वजाची भव्य संकल्पना साकारत या चौकाला देशभक्तीचे आणि शौर्याचे एक नवे प्रतीक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जनरल अरुण वैद्य यांनी भारतीय लष्करात बजावलेली अतुलनीय सेवा, त्यांचे शौर्य आणि राष्ट्रासाठीचे योगदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना केवळ चौकाचे सुशोभीकरण नव्हे, तर शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीची जिवंत आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
शहरातील चौक केवळ वाहतुकीची ठिकाणे नसावीत, तर त्या चौकांना आपल्या इतिहासाची, शौर्याची आणि अस्मितेची ओळख असावी, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साकारलेले हे संकल्पचित्र म्हणजे केवळ रणगाड्याचे चित्र नाही; तर देशासाठी लढलेल्या वीरांना मानाचा मुजरा आणि राष्ट्रभक्तीची जिवंत आठवण जपण्याचा निर्धार आहे.
‘आमचे शहर, आमचा अभिमान’ आपल्या शूरवीरांचा सन्मान, आपल्या शहराची ओळख..!
या कार्यक्रमांमध्ये अतिशय महत्त्वाचे आर्थिक योगदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, डॉ अनुज पाटील, ललित, शर्मा प्रकाश जोशी, प्रदीप पाटील, विशेष उपस्थिती ठाकरे गटाचे गजानन मालपुरे, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…




















