जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२६
जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथील धनंजय देवीदास पाटील या शेतकऱ्यासोबत ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मोबाइलवर आलेल्या संदेशावर क्लिक केल्यानंतर शुक्रवारी एका शेतकऱ्याचा मोबाइल हॅक झाला आणि त्यांच्या खात्यातून सायबर भामट्याने दोन दिवसांत १ लाख ९६ हजार रुपये लांबवले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मोबाइलवर आलेल्या संदेशावर क्लिक केल्यानंतर मोबाइल बंद पडला. मात्र मोबाइल सुरू केल्यानंतर त्यांनी गावातील एका दुकानदाराकडे काही वस्तूंची खरेदी केली. या साहित्याचे पैसे देताना ऑनलाइनचा वापर करून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अकाउंटची ट्रान्ड्रॉक्शन लिमिट संपल्याचा संदेश आला. हे पाहून ते हैराण झाले. त्यांच्या खात्यात दोन लाख रुपयांची शिल्लक असल्याने त्यांनी तातडीने बँकेमध्ये चौकशी केली. तिथे त्यांना कळाले की, दोन दिवसांत त्यांच्या खात्यातून एका यूपीआयच्या मदतीने दोन वेळा प्रत्येकी ९८ हजार रुपयांचे, असे एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
धनंजय पाटील यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केला नसतानाही त्यांच्या बँक खात्यातील रक्कम चोरी झाली. याबाबत त्यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद मेसेजबाबत सावधान रहावे. त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये आणि असे फसवणुकीचे प्रकार घडल्यास लवकरात लवकर बँकेला खाते गोठविण्यास सांगावे, सोबतच सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर त्वरीत संपर्क करावा. अजिबात वेळ वाया दवडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




















