जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२६
सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या निर्मल लालचंद मोनानी (वय ५७, रा. सिंधी कॉलनी) यांचा मृतदेह आवार शिवारात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात निर्मल मोमानी हे राहत होते. ते प्रज्ञाचक्षू असल्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. दि. १४ सप्टेंबर रोजी ते कोणालाही काहीही न सांगता वृद्धाश्रमातून निघून गेले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील ते मिळून न आल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.बेपत्ता झालेले निर्मल मोमानी हे दोन ते तीन दिवसांपासून आवारात ते विदगाव गावादरम्यान रस्त्यावर फिरत होते. दरम्यान आवार शिवारातील रस्त्यालगत असलेल्या एका शेतात त्यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्याला दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मृतदेहाच्या पायाचा भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. तर उर्वरीत संपुर्ण मृतदेह कुजलेला होता. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता असलेलया प्रौढाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. तो मृतदेह उचलत असतांना त्याचे अवयव थेट हातात येत होते. दरम्यान, पोलिसांनी या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्याची विनंती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना केली. मात्र त्यांनी डॉक्टरांकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नव्हता. डॉक्टरांच्या अशा बेजबाबदार पणाचा पोलीसांना नाहक त्रास सहन करावा लागला.



















