जळगाव मिरर | ५ ऑक्टोंबर २०२६
रेल्वे स्थानकावर प्रकृती खराब झाल्यामुळे जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली मो. अकिजारा अख्तर मो. अबछार (वय २५, रा. गारचर युनियन, जि. जमालपूर, बांगलादेश) ही महिला बांग्लादेशी असल्याचे आढळून आले. या महिलेवर दि. १ रोजी पासून उपचार सुरु होते. दरम्यान तीन महिने जयपुर येथे राहिल्यानंतर ती जळगावात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी एक महिला दाखल झाली होती. उपचारादरम्यान बोलणे व भाषेवरून पोलिसांना तिचा संशय आला होता. याविषयी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना माहिती दिली. त्यांनी जिल्हा पेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला अधिक चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता ती बांगलादेशातील रहिवासी असल्याचे समोर आले. दि. ३ ऑक्टोबर रोजी तिला ताब्यात घेऊन शासकीय आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले होते.
एका गुन्ह्यात पिडीता म्हणून सुटका करून शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असलेल्या बांगलादेशी महिलेच्या मदतीने दि. ४ ऑक्टोबर रोजी या बांगलादेशी महिलेचा जबाब घेण्यात आला. ती बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतात अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ करत आहेत.
जयपुरात राहणाऱ्या मावशीने या महिलेला फिरण्यासाठी घेऊन जाणाच्या बहाण्याने रेल्वेने प्रवासाला निघाली. जळगाव स्थानकावर मात्र बांगलादेशी महिलेली प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीचे बिंग फुटले. बांगलादेशी महिलेची जळगाव स्थानकावर प्रकृती खालावल्यानंतर तिच्या सोबत असलेली मावशी मात्र पसार झाली. तसेच या बांग्लादेशी महिलेचा मोबाईल देखील सोबत घेवून गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.




















