जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२६
जामनेर तालुक्यातील दुचाकीस्वारांना आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसांनी अडविल्याने शाब्दिक वाद होऊन वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराची कॉलर पकडून ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी मारहाण केल्याचा आरोप दुचाकीस्वाराकडून केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, वाहन परवाना मागितल्याने दुचाकीस्वारांनी वाद घातल्याच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात दोघा दुचाकीस्वारांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पळासखेडा मिराचे येथील कृष्णा शांताराम पाटील व गणेश शंकर जाधव हे मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) दुचाकीने जळगावात आले होते. आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसांनी दोघांना थांबविले व हा वाद झाला.
संबंधित दोघे म्हणाले की आम्ही जामनेरचे आहेत. आम्हाला कसे काय लायसन्स मागता.. आम्ही काय अतिरेकी आहोत का? असे म्हणत दोघा पोलिसांना आधी त्यांनी धक्का मारला. त्यामुळे पोलिसांनी पोलिस स्टेशनला चल म्हणत शर्ट पकडला. दरम्यान, त्यांनी पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ कट करुन अर्धवट व्हिडिओ व्हायरल केला असून आरोप खोटा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर दुचाकीस्वारांना १५०० रुपयांचा दंड केला असून आतापर्यंत ६ हजारांहून जास्त दंड संबंधितावर पेंडींग असल्याने वाहन परवाना निलंबन कारवाईसाठी अहवाल पाठविला आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखा निरीक्षक महेश्वर पेद्दाम यांनी दिली.




















