जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२६
भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे तयार करून तब्बल १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा कथित अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सभासदांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यांऐवजी अन्य व्यक्तींच्या बँक खात्यात वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल झाला असून, बुधवारी हा तपास जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सहकारी पतपेढीच्या आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १२ सप्टेंबर २०२३ ते ३ मे २०२५ या कालावधीत पतपेढीतील चिटणीस, हिशोबनीस आणि लिपिक पदांवर कार्यरत असलेले राजू लालू गायकवाड आणि अभिजीत दत्तात्रय तायडे यांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे दोघेही सध्या संस्थेतून निलंबित आहेत. या दोघांनी ९८ सभासदांच्या नावाने कथितरीत्या बनावट कर्जप्रकरणे तयार केलीत. तसेच त्यावर सभासदांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कर्जाची रक्कम संबंधित सभासदांच्या खात्यांत जमा करण्याऐवजी अन्य व्यक्तींच्या बँक खात्यांत वळवल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्यवहारांसाठी पाच बँक खात्यांचा वापर झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. तर, फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संशयित व्यवहारातील रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यांत वळवण्यात आली आहे. त्यामध्ये नीलेश रवींद्र महाजन यांच्या खात्यावर ८९ लाख ९२ हजार रुपये आणि ६७ लाख ८५ हजार ६०० रुपये, कुणाल संजय महाजन यांच्या खात्यावर ५८ हजार ३०० रुपये, हर्षल सुनील गावंडे यांच्या खात्यावर १९ लाख ४२ हजार रुपये, रुपाली अभिजीत तायडे यांच्या खात्यावर ६ लाख ४५ हजार ६०० रुपये, तर हर्षल रवींद्र चौधरी यांच्या खात्यावर ४ लाख ३८ हजार ५० रुपये वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सतीश दिंडोरी (रा. दिंडोरी, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतपेढीच्या ९८ सभासदांच्या नावाने कर्जप्रकरणे तयार करून एवढी मोठी रक्कम अन्य खात्यांत वळवल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. नेमकी किती रक्कम कोणत्या व कुणाच्या खात्यात वळवण्यात आली, या व्यवहारांत आणखी कुणाचा सहभाग आहे का, अन् संबंधित रक्कम कुठे वापरण्यात आली, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून हे सर्व स्पष्ट होणार असून, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.




















