
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील राधा कृष्ण नगरातील रहिवासी असलेले दाम्पत्य काकूला भेटण्यासाठी आज १४ रोजी भुसावळ येथे जात असतांना तरसोद फाटयानजीक दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. या अपघातात शितल शेषराव दिपके (वय ३७, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव, ह.मु.औरंगबाद) हे जागीच ठार झालेले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील राधा कृष्ण नगरातील रहिवासी शेषराव भिमराव दिपके हे पत्नी शितल यांच्यासोबत औरंगाबाद येथे वास्तव्याला आहे. शहरातील राधाकृष्ण नगरात त्यांचे आई विमल व वडील भिमराव दिपके हे राहतात. शनिवार १३ ऑगस्ट रोजी शेषराव दिपके हे त्यांची पत्नी शितल सोबत जळगाव शहरात आईवडीलांच्या घरी राधा कृष्ण नगरात आलेले होते.
दरम्यान, रविवारी १४ ऑगस्ट रोजी त्यांची भुसावळ येथे राहत असलेली काकू यांना भेटण्यासाठी शेषराव दिपके व त्यांची पत्नी शितल दिपके हे दुचाकी (एमएच १० बीडी ५००३) ने जळगावहून भुसावळला जाण्यासाठी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्याजवळून दुचाकीने जात असतांना भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत शितल ह्या दुचाकीवरून खाली पडून ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर शेषराव यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेवून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.




















