भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पळासखेडे येथे पेव्हर ब्लॉकचे काम न करता साधारण दीड लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या तत्कालीन उपअभियंत्यासह चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, विस्तार अधिकारी भालचद्र नाटू पाटील(वय ५७, रा.वृदावन कॉलनी, ढेकू रोड अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१९-२० मधील पळासखेडे ता. भडगाव येथील ग्राम पंचायतीला २५/१५ या लेखा शिर्षाखाली पेव्हरब्लॉक बसविणे बाबतचे कामाचे अनुदान प्राप्त होते. त्यात झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविणीचे कामात पळासखेडे येथील १) शिवाजी पाटील ते बहादुर पाटील – ९९ चौरस मीटर २) तुकाराम पाटील २५.८४ ३) रतीलाल पाटील ४२.०५ चौरस मीटर या कामांचा समावेश होता. परंतू सदरची कामाची प्रत्यक्ष पाहणी भडगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय बी लखवाल यांनी केली असता त्यांना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले आढळून आले नाही. त्यामुळे संशयित आरोपींनी या कामात १ लाख ४६ हजार ४२० एवढया रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केली आहे. या प्रकरणी संदीप लक्ष्मन शेलार (तत्कालीन उपभियांता जि.प.बाधकाम उपविभाग एरंडोल), योगेश नंदकिशोर थोरात (तत्कालीन शाखा अभियंता, जि.प.बाधकाम उपविभाग एरंडोल), धनसिंग परशुराम राजपूत (तत्कालीन विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त पंचायत समिती भडगाव) आणि राजेद्र पिराजी सोनवणे (तत्कालीन ग्रामसेवक पळासखेडे ता.भडगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गणेश वाघमारे हे करीत आहेत.