जळगाव : प्रतिनिधी
कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडूहीत लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरुच करणार व या बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांची जामनेर येथे भेट घेतली व निवेदन दिले त्या वेळी ते बोलत होते.
जामनेर येथे भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमांतर्गत मंत्री महोदयांसोबत शिष्टमंडळ व कार्यकत्यांनी मन की बात ऐकून दाद दिली.
मध्यंतरीच्या काळात रखडलेले खातेवाटप नंतर विधीमंडळाचे अधिवेशन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणेस उशीर होत होता. स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडिया मध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र केंद्रीय क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची ॲडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून उशीराने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे कळते. त्या धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रदिप तळवलकर, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव तथा राज्याचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, सचिव प्रा हरिश शेळके, क्रीडाशिक्षक महासंघाचे सल्लागार प्रा ईकबाल मिर्झा, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी गिरीश पाटील, डॉ.क्षितीज भालेराव, प्रा डॉ आसिफ खान, विलास पाटील, पी.डी. पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींचा समावेश होता. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मंत्री महोदयांच्या कार्यालयाशी संपर्क करून निवेदन सादर केले आहे.