चाळीसगाव ; प्रतिनिधी
तालुक्यातील न्हावे येथे आज दुपारी शेतात बापलेकाच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. आबा शिवाजी चव्हाण ( ४५) आणि दीपक आबा चव्हाण अशी या मृत बापलेकांची नावे आहेत. दरम्यान, शेतात काम करणाऱ्या इतर महिला बचावल्या आहेत.
आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक व पत्नी इतर महिलांसोबत सकाळीच शेतात कपाशीला खत देण्यासाठी गेले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजता अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाल्याने ते शेवग्याच्या झाडाखाली थांबले. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. यात बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बाकीच्या महिला थोडक्यात बचावल्या आहेत.
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू
चाळीसगावातीलच खडकी बु. येथे डोहात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सौरव सचिन मोरे (वय १७) याचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरव आपल्या तीन मित्रांसोबत अंबुजा कंपनीच्या मागे असलेल्या डोहात गणपती बुडविण्यासाठी गेला होता. सौरवने गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उडील घेतली. यावेळी सोबत असलेले दोन मित्र डोहाच्या बाहेर उभे होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सौरव मोरेचा पाण्यात बडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही मित्रांनी आरडाओरड केली. यावेळी खदानीच्या बाजूला काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली होती. कामगारांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. परंतू त्याचा मृत्यू झाला होता.