जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४
गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र, आठवीच्या मुलाने या खड्डयात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने या दोघांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील संत प्रसाद नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे ५ फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. या परिसरात पाण्याचा निचरा होत नाही. यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. शुक्रवारी संस्कार आशिष पारध्ये (वय ६) आणि वेदांत आशिष पारध्ये (वय ३) हे दोघे दुकानावर वस्तू घेण्यासाठी बाहेर निघाले. तर गंमत म्हणून खड्डा पहायला गेले. त्यात एकाचा काठावरुन पाय घसरल्याने तो खड्डयात पडला. तर दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला आणि बुडाला खाली माती होती, त्यामुळे ते गाळात फसले.
मात्र, ही घटना राज गणेश महाजन (वय १३) या आठवीतील मुलाने पाहिली. त्याने पटकन पाण्यात उडी मारली व दोघांना बाहेर काढले. त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेल्याने त्यांचा जीव गुदमरला होता. आणखी थोडा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. दरम्यान, या घटनेमुळे परिस्रातील नागरिकांनी संताप व्यक्त करुन ठेकेदारावर रोष व्यक्त केला. अखेर ठेकेदाराने रात्रीच साचलेल्या पाण्याचा निचरा केला. तर राज महाजन याने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.