जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या करीत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता आई मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी, तर वडील परिसरातील मंदिरात गेलेले असताना खुशी ज्ञानेश्वर पिसे (१९, रा. दौलतनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेली खुशी ही आई, वडील व मोठ्या भावासह दौलतनगर भागात राहत होती. तिची आई मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी गेलेली आहे, तर तिचे वडील घरापासून काही अंतरावर असलेल्या मंदिरात व भाऊ बाहेर गेलेला होता. त्यावेळी घरी एकट्याच असलेल्या या तरुणीने गळफास घेतला. तिचा भाऊ घरी आला, तर त्याला बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.



















