जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
देशभरात वर्षांचा अखेरचा आठवडा सुरु असल्याने अनेक लोक अनेक ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जात असतात, अशाच एका पर्यटन ठिकाणाहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांदण दरी पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झालाय. दरी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यात समोर आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी दि. २४ डिसेंबर रविवारी सकाळी ११ चा सुमारास आले असता. दरी पाहण्यासाठी आलेली ही तरुणी काही अंतरावर आल्यावर घसरून पडली. ती पडली त्यावेळी तिच्या आजुबाजूला तिला पटकन सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे ती खोल दरीत कोसळली. बऱ्याच उंचावरून दरीत पडल्याने तिच्या हातापायांना तसेच डोक्याला मोठा मार लागला. यात ऐश्वर्या खानविलकर (वय २४) असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणी आपल्या मित्रपरीवारासह पर्यटनासाठी आली होती. रविवारची सुट्टी आणि सोमवारी जोडून ख्रिसमसची सुट्टी असल्याने तरुणी आणि तिच्या मित्रांनी बाहेर फिरण्याचा प्लान केला होता. बाहेर फिरण्याचा हा प्लान अशा पद्धतीने फसेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.
निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन आता वनविभागासह पोलिस प्रशासनाने केलं आहे. पर्यटनस्थळी नेहमीच अशा घटना घडत असतात. अशावेळी प्रवास करताना आणि निसर्गाचा आनंद लुटताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे जरी दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केल्यास व्यक्तींचा जीव जातो. आपल्या ग्रुपमधील आपल्यासोबत खेळणारी, बागडणारी मैत्रीण अशा पद्धतीने या जगाचा निरोप घेईल अशी कल्पनाही या मित्रांनी केली नव्हती. मैत्रिणीच्या निधनाने ग्रुपमधील सर्वच मुला मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.