जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२३
एका २६ वर्षीय विवाहितेने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा या गावी घडली आहे. या घटनेनंतर या दोघांना काढताना एका तरुणाचा देखील विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये मृत मायलेकरांची नावे शीतल गणेश थुट्टे (वय २६), देवांश गणेश थुट्टे (२१ महिने) अशी असून मृत युवकाचे नाव सिद्धार्थ निंबाजी शिरसाट असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरोसा येथील गणेश थुट्टे (वय ३०) यांची पत्नी शीतल ही सोमवारी शेतीकामासाठी स्वतःच्या शेतात गेली होती. गणेशने शीतलला लवकर घरी येण्यासाठी फोन केला. त्यामुळे ती तिच्या २१ महिने वयाच्या मुलाला, देवांशला घेऊन सायंकाळी ४ च्या सुमारास घराकडे निघाली. परंतु सायंकाळपर्यत शीतल घरी पोहोचली नाही. त्यामुळे शीतल व देवांशची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.
कुणीतरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या रस्त्यात असलेल्या शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात देवांशचा मृतदेह तरंगताना दिसून आला. शीतलने चिमुकल्या देवांशसह रात्री गावातील दिनकर जाधव यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विहिरीजवळ गावकरी जमा झाले असता सिद्धार्थ शिरसाट या तरुणाने उत्साहाच्या भरात मायलेकांना बाहेर काढण्याकरिता विहिरीत उडी मारली होती. मात्र रात्रीचा अंधार, विहिरीतील गाळ यामुळे त्याचाही मृत्यू झाला. सिद्धार्थ पाण्याबाहेर न आल्यामुळे त्याला काढण्यासाठी सुगदेव थुट्टे (५५) यांनीही विहिरीत उडी मारली. आतमध्ये ते अस्वस्थ झाले. त्यामुळे विहिरीच्या काठावर असलेल्या लोकांनी विहिरीत लगेच दोर टाकला. तो दोर हाती लागल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अंढेरा पोलिसांना या घटनेची माहिती माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढलेत व उत्तरीय तपासणीकरिता चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेत तिघांजणांना जीव गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे