जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५
एरंडोल–कासोदा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जबरदस्त धडकेत येथील कापूस व फळ व्यापार करणारे अशोक भिका भोई (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणांबद्दल ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वरुत असे की, एमएच-१५, केई २९४९ क्रमांकाच्या दुचाकीवरील तरुण आडगावकडून भरधाव वेगाने येत असताना एरंडोल–कासोदा मार्गावरील साई हॉस्पिटलजवळ उभे असलेले अशोक भोई यांना चिरडणारी धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघाताबाबतची नोंद उशिरापर्यंत कासोदा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास पोलीस करत आहेत. अशोक भोई हे कापूस व फळ व्यापारात कार्यरत होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते कासोदा येथील कापूस व्यापारी व भोई समाजाचे अध्यक्ष हिंमत भिका भोई यांचे लहान बंधू होत.
अकस्मात निधनाने गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या वेगाने दुचाकी चालविणाऱ्या तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, अशा घटनांना जबाबदार कोण आणि या युवकांना आळा घालणार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.





















