जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२६
जळगाव-भुसावळ महामार्गावरील कंडारी फाटा (उमाळा) जवळ एका भीषण अपघातात प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सुनीता बाविस्कर गंभीर जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाविस्कर दांपत्य दुचाकीने (एम.एच. १९ ई.डी. ९३३९) उमाळा फाट्याकडून भुसावळ तालुक्यातील मन्यारखेड्याकडे जात होते. दुपारी सुमारे ४.४० वाजता पाठीमागून येणाऱ्या बसने (एम.एच.१९-७४०१) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रल्हाद बाविस्कर उडून जळगावकडून येणाऱ्या एका कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आले. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुनीताबाई रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांना हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मृतकाचे चुलत भाऊ बाबुराव नामदेव बाविस्कर यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर बस चालक सचिन भारत बागुल (४१, रा. रावेर) याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने व भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास हवालदार हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील करीत आहेत.




















