जळगाव मिरर | ३ सप्टेबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आप आपल्या आमदारकीच्या उमेदवारीसाठी अनेक पक्षाचे उंबरठे झीजविणे सुरु केले असून नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ.एकनाथ खडसे यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे मोठे विधान केल्यावर मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांनी आ.खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आ.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत. तर हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत, खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारे आहे, अशी नाव न घेता जहरी टीकाही त्यांनी केली आहे. खडसे म्हणतात, आज मी भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये. आधी त्यांनी सुनेला लोकसभेत पोहोचवले, त्यानंतर आता एकनाथ खडसे यांचे मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण सुरू आहे. त्यांनी 30 वर्षात कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा असूनही राज्यातील भाजपकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, असे सांगत एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, त्यांचे थेट मोदी आणि शहांशी संबंध असल्यामुळे त्यांच्या प्रवेश होणे, न होण्याशी आमचा संबंध नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरात लागलेल्या होर्डिंगवर खडसे आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात खडसे यांनी सोमवारी ही माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजप प्रवेश झाला आहे, असे खडसे यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘दिव्य मराठी’ला सांगितले होते. त्याचा पुनरुच्चार करून खडसे म्हणाले की, तो प्रवेश झाला असला तरी खाली काही लोकांनी त्या प्रवेशाला विरोध केलेला दिसतो. त्यामुळे तो प्रवेश जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षात राहाणे योग्य नाही, असे आपले मत असून वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा निर्णय घेत आहोत. खाली विरोध कुणाचा हे सांगताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची नावे घेणे टाळले.