जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पाटील तसेच आयुष मणियार व पियुष मणियार या दोघा भावांवर गंभीर आरोप केले. या आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक पाटील यांना निलंबित केले होते.
आमदार चव्हाण यांनी बैठकीत “मणियार बंधूंना शस्त्र परवाना मिळवण्याची आवश्यकता काय?” असा प्रश्न उपस्थित करत या परवान्याच्या वैधतेवर आक्षेप घेतला होता. विशेष बाब म्हणजे, पूर्वी एकदा नाकारण्यात आलेला शस्त्र परवाना दुसऱ्या प्रस्तावाद्वारे मिळवण्यात आला होता, ही बाबही चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, मणियार बंधूंनी मिळवलेला शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या शिफारशीनुसार पोलिस विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार चव्हाण यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरु असून या प्रकरणात आयुष मणियार याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात पोलीस व प्रशासन यंत्रणेत खळबळ उडाली असून, कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील कारवाई अपेक्षित आहे.
‘या’बंधूंना राजकीय आश्रय कुणाचा ?
आ.चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ‘या’ बंधूंवर गंभीर आरोप केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात या बंधूना राजकीय आश्रय कुणाचा यावर मोठी चर्चा रंगली होती. जर खरच यांच्यामागे राजकीय ताकद असेल तर या दोन्ही बंधूंवर चौकशी होवून नेमकी कुठली कारवाई होते. याकडे देखील जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.