
जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५
कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दिला जाणारा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५’ यंदा महाराष्ट्रातील जळगाव येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना प्रदान करण्यात आला. सहकारी चळवळीत त्यांच्या दीर्घकालीन व भरीव योगदानाची दखल घेत, संपूर्ण देशभरातून फक्त दोन व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.
या पुरस्काराचा समारंभ कृभकोच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने २५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अशोका हॉटेल, चाणक्यपुरी येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला कृभकोचे अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी, एशिया पेसिफिक संचालक चंद्रपालसिंग यादव, इफकोचे चेअरमन दिलीप सिंघानिया, एनसीसीएफचे चेअरमन विशाल सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया तसेच कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. यादव आदी सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शैलजादेवी निकम यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. शैलजादेवी निकम यांनी १९९५ ते १९९७ या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष व संचालक या पदांवर काम करत सहकारी व्यवस्थापन, शेतकरी सक्षमीकरण, महिला सहभाग यासाठी कार्य केले. पुरस्कार मिळाल्यानंतर देशभरातून विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी व सहकार प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार केवळ वैयक्तिक गौरव नसून, महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या तेजाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.





















