
जळगाव मिरर | २१ नोव्हेबर २०२३
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर दौरे सुरु असतांना दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरु लागली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला हिंंसक वळण लागल्याचे समोर आले असून आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाजाकडून महामोर्चा काढण्यात आला. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने मोर्चेकरांनी मोठा गोंधळ केला. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव सहभागी झाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना अडवण्यात आले. ज्यामुळे संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली.