
अमळनेर : प्रतिनिधी
मुलांचा निकाल बघायला शाळेत गेलेल्या सरकारी वकिलाचे घर फोडून ३ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. १ रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान धुळे रोडवर सर्वत्रनगरमध्ये घडली.
जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील असलेले अॅड. किशोर बागुल आपल्या मुलांचा सहामाही परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन घराला १० वाजून ५ मिनिटांनी कुलूप लावून ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये गेले होते. १० वाजून ५५ मिनिटांनी ते घरी परत आले असता त्यांना घरातील बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांना मागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. घरातील कपाटातील २ लाख ३५ हजार रुपयांची ४७ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ८० हजार रुपयांची १६ ग्रॅम सोन्याची जुनी पोत, ६० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील, १० हजार २०० रुपये रोख असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. बागूल यांना शाळेत जाण्यापूर्वी दोन मुले संशयितरीत्या फिरताना आढळून आली. अॅड. बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.
पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथक मागवण्यात आले होते. ठसेतज्ज्ञ सचिन चौधरी यांनी कपाट तसेच विविध वस्तूंवरील ठशांचे नमुने घेतले.




















