
जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३ ।
शिनू नगरातील रहिवासी पुनीत सुहास थोरात लग्नाची तयारी करण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या असतांना बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोरात हे त्यांच्या लग्नाची तयारी करण्यासाठी गुरुवारी धरणगाव येथे गेले होते. शनिवारी त्यांचा भाऊ योगेश घरी आला व तो परत गेला. हीच संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला. बुधवारी सकाळी पुनीत थोरात यांना त्यांचे नातेवाईक बंटी चौधरी यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर थोरात यांनी शिनू नगरातील घर गाठले. घरात पाहणी केल्यावर सामान अस्ताव्यस्त फेकलेले तर कपाटातील सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तर घराचे कुलूप चोरट्याने मास्टर चावीने उघडले असल्याचेही दिसून आले. सायंकाळी थोरात यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहेत.




















