जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२४
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल चालक, व्यवस्थापक व त्यांना मदत करणाऱ्या तिघांना अटक केली. या हॉटेलमधून एका महिलेला व तेथून जवळच असलेल्या हॉटेल यश येथून दुसऱ्या महिलेला ताब्यात घेतले. अटक केलेल्या नीलेश राजेंद्र गुजर (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी), चेतन वसंत माळी (वय २१, रा. कुसुंबा, ता. जळगाव), विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. खेडी, ता. जळगाव) या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल चित्रकूट येथे अवैधरित्या कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक कारवाईसाठी हॉटेलजवळ पोहचले. पोलिस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. त्यानुसार डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, पोकों गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर या पथकाने तेथे छापा टाकला. काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी हे दोघे मिळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेले पैसे आणि मोबाईल मिळून आले. तसेच हॉटेलच्या पाहणीत तेथील एका खोलीत डमी ग्राहक व पीडित महिला मिळून आली.
हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोकों गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात येऊन रविवारी न्यायालयात हजर केले असता तिघी पुरुषांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर दोन्ही महिलांची आशादीप शासकीय महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे