जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२४
शहरातील ईच्छादेवी पोलीस चौकी शेजारी वाहनात गॅस रिफिलींग करतांना स्फोट प्रकरणी गॅस रिफिलींग सेंटरला सिलींडर पुरवठा करणाऱ्या इसा उर्फ व्यापारी हमीद शेख (वय ३५, रा.तांबापुरा) याला मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले असून संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इच्छा देवी चौकात पोलीस चौकीला लागूनच अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस रिफलिंग सेंटर येथे वाहनात घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबिांसह ११ जण गंभीररित्या भाजल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली होती. या घटनेत आतापर्यंत भरत सोमनाथ दालवाला (वय ५५), सूरज भरत दालवाला (वय २३) या बापलेकांचा जळगावात तर संदीप सोपान शेजवळ (वय ४२) व गॅस सेंटरचा मालक दानिश शेख अनिस शेख या दोघांचा मुंबईत उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात मृत दानिश याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
या सेंटरमध्ये सहभाग असलेल्या इसा व्याारी यालाही आरोपी करण्यात येऊन मंगळवारी अटक करण्यात आले. या सेंटरवर इसा हाच गॅस सिलिंडरचा पुरवठा करीत होता, त्यामुळे तो कोणाकडून त्या उपलब्ध करत होता. याचा देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे.
गॅस रिफिलींग सेंटर स्फोट प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का?, संशयितांचा अजून कुठे व्यवसाय सुरु होता का? या मुद्यावर चौकशी करण्यासाठी तपासाधिकारी दत्तात्रय निकम यांनी न्यायालयाकडे पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्या. केळकर यांच्या न्यायालयाने ती मान्य केली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड, रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. तसेच या प्रकरणात आता पोलिसांना आता ही साखळी शोधून काढण्याचे आव्हान आहे.