जळगाव मिरर | ३ मे २०२४
रेल्वे प्रवासात मोबाईल चोराचा पाठलाग करताना चोराच्या साथीदारांनी पोलिसाच्या पाठीत टोचलेले इंजेक्शन आणि पाजलेल्या लाल द्रव्यामुळे त्या पोलिसाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशाल पवार असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव असून, या प्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या वरळी येथील सशस्त्र पोलीस बलात कार्यरत असलेले विशाल पवार हे ठाण्यातील कोपरी, चेंदणी, कोळीवाडा येथील अमोल घुले यांच्या घरी राहात होते. त्यांना भायखळ्यातील रहिवासी जमिल खतलाम यांच्या घरी गार्ड ड्युटी देण्यात आली होती. नेहमीप्रमाणे २७ एप्रिलला विशाल पवार हे कर्तव्यावर हजर होण्यासाठी रात्री घराबाहेर पडले. ठाणे स्थानकातून लोकल पकडून ते भायखळा येथे येत होते. त्या वेळी सव्वानऊच्या सुमारास लोकल माटुंगा स्थानकात पोहोचत असताना मोबाईल चोरांच्या फटका गँगने त्यांच्या मोबाईलवर फटका मारला. पवार यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. खाली पडलेला मोबाईल उचलून चोराने पळ काढला. या वेळी लोकल संथगतीने चालत असल्याने पवार यांनी लोकलमधून खाली उडी घेत मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर रेल्वे रुळांमध्ये त्या चोराचे दोन साथीदार होते. या दोघांनी पवार यांना अडवून धक्काबुक्की सुरू केली. रात्रीच्या काळोखात सुरू असलेल्या झटापटीत एकाने पवार यांच्या पाठीत इंजेक्शन टोचले. त्यामुळे चक्कर येऊन पवार खाली कोसळले. त्यानंतर त्या दोघांनी जबरदस्तीने पवार यांना पाण्याच्या बाटलीत भरलेले लालसर द्रव्य पाजले. त्यानंतर पवार यांची शुद्ध हरपली. ते बेशुद्ध अवस्थेत तेथेच पडून होते.
चोरांनी त्यांचा मोबाईल आणि खिशातील पैसे चोरी करून पळ काढला. तीनच्या सुमारास ते थोडे शुद्धीवर आले. त्यांनी चालत माटुंगा रेल्वे स्थानक गाठले. काही समजत नसल्याने पवार माटुंगा रेल्वे स्थानकात बसले होते. ११ वा. च्या सुमारास लोकल पकडून ते ठाणे येथे गेले. त्यांनी घडलेला प्रकार भावाला सांगितला. डोक्यावर ताण येत असल्याने आणि काहीच समजत नसल्याने पवार घरीच झोपले. पवार यांना रात्री उलट्या होऊ लागल्या. भावाने २९ एप्रिलच्या दुपारी त्यांना उपचारासाठी ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे उष्माघात कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान कोपरी पोलिसांनी पवार यांचा जबाब नोंद केला. यात त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांकडे नोंदवत शुद्धीवर आल्यावर आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. डॉक्टरांनी पवार यांना बुधवारी मृत घोषित केले.
अखेर, कोपरी पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ३२८, ३९२, ३९४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हा पुढील तपासासाठी दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.




















