जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
आपण नायब तहसीदार असल्याचे भासवून निनाद विनय कापूरे (रा. धरणगाव) याने दोन तरुणींकडून पैसे घेवून त्यांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात नाशिक व फलटण येथील तरुणींनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत निवेदन तक्रार केली. यातील फलटण येथील तरुणी डॉक्टर असून याप्रकरणी नाशिक येथील तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील निनाद कापुरे याने मॅरेज ब्युरोद्वारे नाशिक येथील तरुणीसोबत संपर्क साधून त्यांना लग्नाचे अमिष दाखविले. तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर असलेल्या तरुणीला त्या संशयिताने लग्नाचे मागणी घत्तलून लग्न ठरविले होते. तसेच त्याने या तरुणींना आपण नायब तहसीदार असून त्याला शासनाने प्रदान केलेली पगार स्लिप दाखवून आणि ऑफिसमध्ये काम करतांनाचे फोटो तरुणींना दाखवून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर नाशिक येथील तरुणीकडून सात लाख तर फलटण येथील तरुणीकडून दोन ते तीन दिवसांच्या परतफेडीच्या कारण सांगून आठ लाख रुपये घेवून त्यांची आर्थीक फसवणुक केली.
संशयित निनाद कापूरे याने आतापर्यंत सुमारे पाच ते सहा मुलींना लग्नाचे अमिष दाखवून त्यांची आर्थीक फसवणुक केली. त्याच्याविरुद्ध नाशिक येथील आडगाव पोलीस ठाणे व फलटणसह इतर देखील तक्रारी केल्या आहे. तसेच कापूरे याने त्याची पत्नीची देखील फसवणूक केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दोन ते तीन दिवसांच्या परतफेडीच्या बोलीवर तरुणींकडून पैसे घेतले. तसेच सरकारी लाल दिव्याच्या वाहनाची व तहसीलदारांच्या खुर्चीवर बसला असल्याचे फोटो तसेच पैसे दिल्याचे पुरावे तरुणींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
