जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४
शहरातून भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीस्वराला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अनोळखी इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील बुलेट शो-रुम समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बुलेट शोरुम समोर जळगावकडून भुसावळकडे (जीजे ०५, एमएस ९५१८) क्रमांकाच्या दुचाकीवरुन एक इसम जात होता. यावेळी भुसावळकडून मुंबईकडे (डबल्यूबी २३, एफ ७९९८) क्रमांकाच्या कंटेनर हा भरधाव वेगाने येत होता. या कंटेनरने दुचाकीस्वाराला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पुर्णपणे चुराडा झाला असून दुचाकीस्वार अनोळखी इसम गंभीर जखमी झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी तात्काळ जखमीला रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.