जळगाव मिरर । १७ नोव्हेंबर २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळील महामार्गावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने राँग साईडने येत असलेल्या क्रेनने समोरून येणाऱ्या रिक्षाला ठोकल्याने रिक्षा चालक अशपाक अहमद तस्सुफ (वय ४६, रा. अक्सानगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगांव पोलिसात क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मृतक अशपाक सकाळी सुमारे सात वाजता जळगाव येथून मुक्ताईनगरसाठी नारळ विक्रीसाठी रिक्षा (एम.एच.१९/सी.डब्लु ६८१२) ने निघाले होते. घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, वरणगांव गावाजवळील नागराणी पेट्रोलपंपाजवळील मोरीवर त्यांची रिक्षा समोरून येत असलेल्या क्रेन (एम.पी. ११ एच १११९) ने ठोकली. अपघातानंतर अशपाक यांना डोक्याला, छातीला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, वरणगांव येथे दाखल केले असता डॉ. युवराज त्यांना मृत घोषित केले.
तक्रारदार आणि मृतकाचे भाऊ, इम्तियाज तस्सुफ शेख यांनी सांगितले की, क्रेन चालकाने वाहन विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने चालवले आणि मोरीवरील रस्ता अरुंद असल्यामुळे रिक्षा खाली उतरून वाचू शकत नव्हती. यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. सदर क्रेन चालकाचे नाव आणि पत्ता अद्याप माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून, घटनास्थळी वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अमित कुमार बागुल, पोलिस यासिन पिंजारी आणि प्रशांत ठाकूर तपास करीत आहेत.




















