जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
शहरातील शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय परिसरात एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे, तसेच या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची ही पाच महिन्यातील तिसरी घटना असून, या प्रकरणी जर महाविद्यालय प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही, तर अभाविपकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शुक्रवारी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, गुरुवारी एका विद्यार्थ्याला महाविद्यालयातील सीनियर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. यापूर्वी ही एप्रिल महिन्यात अशी घटना घडली होती. तेव्हाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून घटनेनंतर अधिष्ठातांना निवेदन देऊन दोषी विद्यार्थ्यांवर अँटी- रॅगिंगअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. आता पुन्हा असाच प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अभाविपकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्य विद्यापीठ व आयुष मंत्रालयाला निवेदन देण्यात आले आहे. जर महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ या घटनांना आळा घातला नाही, तर अभाविपकडून महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रसिद्धीपत्रकावर नगरमंत्री चिन्मय बाविस्कर, प्रतीक साळी, मनोज कुंभार, गणेश दुसाने यांचे नाव होते.