जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२४
सायकलने शिकवणीला जात असलेल्या तनिष्का परेश नेवे (वय १२, रा. भोईटे नगर) या विद्यार्थिनीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात ती विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील गुड्डडुराजा नगरजवळ झाली. अपघातानंतर कारचालक न थांबता पसार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भोईटे नगरातील परेश सुधाकर नेवे हे व्यावसायीक आहेत. त्यांची इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी तनिष्का ही शनिवारी सायकलने क्लासला जात होती. त्या वेळी एका कारने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागण्यासह डोळ्याच्या वरील हाडाला टीच गेली आहे. या सोबतच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर कारचालक तेथे न थांबता कारसह पसार झाला. घटनास्थळाजवळील एका दुकानदाराने धाव घेत विद्यार्थिनीच्या घरच्यांना याविषयी माहिती दिली.
जखमी तनिष्काला तिच्या कुटुंबीयांनी लागलीच आकाशवाणी चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात तनिष्कावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परेश नेवे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालकाविरुद्ध बीएनएस कलम २८१, १२५ (अ), (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्का वानखेडे करीत आहेत.