जळगाव मिरर / २० एप्रिल २०२३ ।
सध्याच्या काळात मोठमोठ्या शहरामध्ये ग्रामीण भागातून अनेक तरुण नोकरीसाठी येत असतात अशा ठिकाणी प्रत्येक व्यक्ती भाड्याची रूम घेवून आपले दिवस काढत असतो पण जेव्हा एखादा मालक आपली मालमत्ता कोणाला तरी भाड्यानं देतो, तेव्हा काही वर्षांनी भाडेकरू आपल्या घरावर हक्क दाखवतील का अशी भीती त्याला वाटत राहते.
असं म्हटले जातं की जर भाडेकरू कोणत्याही मालमत्तेत १२ वर्षे राहत असेल तर तो त्यावर मालकी हक्क सांगू शकतो. अशीच प्रकरणं तुम्ही अनेकदा पाहिली असतील. असं असलं तरी, घरमालक जेव्हा भाड्यानं घर देतो तेव्हा त्याला करारनामा करून घ्यायला हवा.
आता प्रश्न पडतो की हे नियम काय आहेत. ज्यावर भाडेकरू घरमालक दावा करू शकतात. आपण भाडेकरू आणि घरमालकाशी संबंधित हे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया. हे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमचे घर सहजपणे भाड्यानं देऊ शकता. जर तुम्ही भाडेकरू असाल तर तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.
कसा कराल बचाव?
तुमचे घर भाड्यानं देताना, घरमालकानं भाडे करार केला पाहिजे. यानंतर, वेळोवेळी त्याचं नूतनीकरण करत रहा. अशा प्रकारे, तुम्ही तुमची मालमत्ता दुसर्या व्यक्तीला भाड्यानं दिल्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे असेल. या परिस्थितीत कोणताही भाडेकरू त्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही. जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रॉपर्टीवर १२ वर्षांपासून ऑक्युपाय करून असेल तर कायदाही त्याच्या सोबत असतो.
केव्हा दाखवू शकतात हक्क
तुमच्या माहितीसाठी सांगायचं झाल्यास कोणताही भाडेकरू घरमालकाच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकत नाही. पण अशा काही अटी आहेत. जेथे भाडेकरू मालमत्तेच्या मालकीचा दावा करू शकतो. भाडेकरू १२ वर्षांपासून राहत असल्यास. घरमालकाकडून त्याला कोणतीही विचारणा होत नसल्यास, भाडेकरूला हे सिद्ध करावं लागेल की तो १२ वर्षांपासून सातत्यानं यात राहत आहे, त्यात कोणताही खंड पडलेला नाही. हक्क दाखवणाऱ्याला प्रॉपर्टी डीड, टॅक्स रिसिट, वीज अथवा पाण्याचं बिल, साक्षीदारांचं ॲफिडेव्हिटचीदेखील आवश्यकता असतं.