जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
एरंडोल तालुक्यातील तळई येथील गोकुळ उद्धव महाजन व दादाजी उद्धव महाजन या दोन्ही सख्ख्या भावांच्या घराला भीषण आग लागल्यामुळे दोन्ही घरे जळून खाक झाली. यामुळे दोघा भावांचा संसार उघड्यावर आला आहे. दि.१६ रोजी मध्यरात्री २.३० ते ३.०० वाजेच्या दरम्यान दोन्ही घरांना भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे कि, घरातील सदस्यांना घरात झालेल्या धुरामुळे अचानक जाग आली. यावेळी ग्रामस्थांना समजल्यामुळे ग्रामस्थ हि आग विझवून आटोक्यात आणण्यासाठी धावून आले. परंतु, घराला लागलेली आग इतकी भीषण होती कि, ती आटोक्यात आणणे शक्य नव्हते. आगीने रौद्र रूप धारण केलेले होते. आग आटोक्यात येईपर्यंत दोन्ही घरे जळून खाक झालेली होती. यामध्ये घरातील संसारपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
यामध्ये दादाजी महाजन यांचा मुलाचे शैक्षणिक कागदपत्रांसह लॅपटाप हि जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दोन्ही भावांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आता त्यांचा संसार उघड्यावर आला असून संसाराची राख रांगोळी झाली आहे. त्यांचे डोक्यावरचे छत गेले आहे. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याजवळ आता काहीही शिल्लक राहिलेले नाही. तरी, लोकप्रतिनिधी, व शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.