जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
बनावट पत्ता देऊन पशूखाद्य मागविल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत जळगावातील व्यापारी कांचन सुरेश येवले (वय ३८, रा. पिंप्राळा) यांची २ लाख ३४ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना दि. १२ ते दि. १३ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी गोरख कैलास दुधारे (रा. – गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळ्यात राहणारे कांचन येवले यांचा पशुखाद्याचा व्यवसाय असून त्यांचे औद्योगिक वसाहत परिसरात कार्यालय आहे. त्यांच्याशी गोरख दुधारे याने संपर्क साधून आपला पशुखाद्याचा व्यवसाय असून तुमच्याकडून पशूखाद्याच्या १७० गोण्या पाठवा असे सांगितले. त्यानुसार येवले हे दोन लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या पशुखाद्याच्या १७० गोण्या ट्रकमध्ये घेऊन ते स्वतः सांगितलेल्या पत्त्यावर देऊन आले. त्या वेळी मात्र दुधारे तेथे हजर नव्हता. आपण कन्नड येथे असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे पाठवितो असे त्याने सांगितले. मात्र बरेच दिवस झाले तरी रक्कम मिळत नसल्याने येवले यांनी दि. ३० डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोरख दुधारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहेत.
पशुखाद्य देण्यापूर्वी येवले हे आगाऊ रक्कम घेतात. मात्र मागणी केली त्या दिवशी शनिवार व रविवार असल्याने बँकेला सुटी असल्याचे सांगत दुधारेने माल मागविला व नंतर रक्कम देतो, असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला त्यामुळे येवले यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. पैसे मिळत नसल्याने काही दिवसांनी येवले हे समोरील व्यक्तीने सांगितलेल्या पत्यावर गेले असता तसा कोणताही पत्ता तेथे नव्हता. त्यामुळे जेथे माल पोहचविला तेथे गेले असता तो गाळा जितेंद्र नवरे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. तसेच जो माल दिला होता तो तेथून लगेच गायब करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर जितेंद्र नवरे हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधारेच असल्याचे उघड झाले. पैशासाठी पाठपुरावा केल्यानंतर दुधारे याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची येवले यांना धमकी दिली. या विषयी ते खुलताबाद पोलिस ठाण्यात गेले असता दुधारेवर अगोदरच आठ ते नऊ गुन्हे दाखल असल्याचे समजले. तो अशाच पद्धधीतेन ऑनलाईन माहिती घेत वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून माल मागवितो व त्यांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.