जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२३
देशासह राज्यात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून अनेक गणपती मंडळाजवळ भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. अशातच गणपतीच्या भजनावरून परतत असताना अंगावर झाड कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावंतवाडीच्या राजवाडा परिसरात घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी, अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण मंगळवारी गणपतीच्या भजनासाठी सावंतवाडीत आले होते. रात्री ११ वाजता भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी परतत होते.
दरम्यान, दुचाकीवरून जात असताना राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर त्यांच्या दुचाकीवर भलेमोठे भेडले माडाचे झाड कोसळले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पालिकेचा बंब आणि रुग्णवाहिका दाखल झाली. पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने दोघाही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघाही तरुणांचे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले.