
जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६
वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत कोळी वाड्यातील सागर उर्फ वैभव दिलीप कोळी (वय २५) या तरुणाचा मालवाहू रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर कोळी हा मंगळवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. स्टेशनपासून दादरा परिसराच्या काही अंतरावर भुसावळकडून येणाऱ्या मालवाहू रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सागरचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर सागर कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ येथे पाठवण्यात आला. अशोक पुंडलीक कोळी (रा. वरणगाव) यांच्या माहितीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे सुमारे आठ ते नऊ वर्षांपूर्वी सागरच्या भावाचाही याच परिसरात रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. रेल्वे प्रवासादरम्यान पाय घसरून तो रेल्वेखाली सापडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सागरच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असा परिवार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सागर हा कष्टाळू, मनमिळावू व नेहमी मदतीला धावून जाणारा तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने वरणगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




















