
जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४
जेईई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या यश गणेश खर्च (वय १८, रा. जोशीवाडा, मेहरूण) या विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात यश खर्च हा आई वडीलांसह वास्तव्यास होता. त्याच परिसरातील असलेल्या राज विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी जेईई परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाल्यामुळे तो काहीसा निराश झाला होता. मंगळवारी रात्री यशने आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेला. मध्यरात्रीच्या सुमारास यशने खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
नेहमीप्रमाणे यशची आई बुधवारी सकाळच्या सुमारास त्याला उठविण्यासाठी गेली. बराच वेळ आवाज दिला तरी आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी आपला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन यशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.