जळगाव मिरर | १ जुलै २०२५
यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी जळगाव येथील १८ वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील आठ तरुण सुट्टी असल्याने धरणावर गेले असताना ही घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, रविवारी दुपारी सुटीचा आनंद घेण्यासाठी दुचाकीवरून निंबादेवी धरणावर आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास काहीजण धरणाच्या पाण्यात उतरले. यावेळी रामेश्वर कॉलनी परीसातील १८ वर्षीय तरुण हा अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडून गेला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र कोणालाही पोहता येत नसल्याने प्रयत्न अपयशी ठरले. घटनेची माहिती सावखेडासिमचे पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिस ठाण्यात दिल्यानंतर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अंधार पडेपर्यंत शोधमोहीम राबवली, मात्र तोपर्यंत तरुणाचा पत्ता लागला नाही.
