जळगाव मिरर | १० मार्च २०२५
यावल तालुक्यातील फैजपूर येथील पेहेड वाडा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या भावेश सुरेंद्र चौधरी (वय २२) या तरुणाचे ८ मार्चला दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुणे (सासवड) येथे अपघाती निधन झाले. दुचाकीवरून जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला धडक होऊन झालेल्या अपघातात या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील पेहेड वाडा येथील भावेश चौधरी यांची आधीपासूनच गरिबीची परिस्थिती होती. त्यांचे वडील स्वर्गीय सुरेंद्र काशिनाथ चौधरी हे रिक्षाचालक होते. त्यांचेही काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. परिस्थिती गरिबीची असताना अशा परिस्थितीत या तिघा मुलांना त्यांच्या मातोश्री रत्ना सुरेंद्र चौधरी यांनी मेस चालवून मोठे केले. तर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करून तिघा मुलांना उच्चशिक्षित केले. दोघं बहिणींचे उच्च शिक्षण होऊन त्यांचे विवाह झालेले आहेत. तर ते सध्या पुणे येथे वास्तव्याला आहेत.
दरम्यान, भावेश चौधरी यांनी हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच ते एका कंपनीमध्ये जॉबसाठी कार्यरत झाले होते. दरम्यान, शनिवारची सुट्टी असल्यामुळे एका कामानिमित्त ते सासवड येथे जात असताना एका डंपरला आदळून भावेश चौधरी या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण परिवारावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ९ मार्चला फैजपूर येथे भावेश चौधरी या युवकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे.