जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२५
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गणेशपूर येथील हिलाल दगा पाटील (वय ३८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, हिलाल पाटील १ ऑगस्टला सकाळी त्यांच्या शेतात गेले होते. शेततळ्याजवळून जात असताना त्यांचा पाय घसरून ते थेट पाण्यात पडले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ शेततळ्याकडे धाव घेतली. परंतु, शेततळ्यात प्लास्टिकचा कागद असल्याने आणि पाणी भरलेले असल्याने, त्यांना बाहेर काढण्यात अडचणी आल्यात. दोराच्या सहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत हिलाल पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गणेशपूर गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
